पाहातोसी काय। आता पुढे करी पाय।
वरि ठेवू दे मस्तक। ठेलो जोडूनि हस्तक।
बरवे करी सम। नको भंगो देऊ प्रेमे।
तुका म्हणे चला। पुढती सामोरे विठ्ठला।
इंदापूर येथे दुसऱ्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापुरात मुक्कामाला राहिला. अनेक दिवसांनंतर सलग दोन दिवस पालखी सोहळ्याची सेवा करायची संधी इंदापूरकरांना मिळाली. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण व तालुकाभर सरीमागून सरी कोसळल्याने इंदापूरकर दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सुखावला. सलग तीन वर्षे इंदापुरात पाऊस नव्हता, तो शुक्रवारी तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या साक्षीने पडला. अशा पावसातही भाविक पादुकांच्या दर्शनासाठी रांगा लावून होते.
इंदापूर रोटरी क्लबच्या वतीने वारक ऱ्यांना मिनरल वॉटर, चहा, बिस्किटे, भोजन देण्यात आले. अध्यक्ष माळुंजकर, संजय दोशी, मुकुंद शहा आदी सदस्यांनी वरील उपक्रमाचे नियोजन केले. डॉ. संदेश शहा, डॉ. राधिका शहा यांनी वारकऱ्यांसाठी मोफत होमिओपॅथीक शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात रोगनिदान करून मोफत औषधे वाटण्यात आली. आज दिवसभर इंदापूरकर वैष्णवांच्या सेवेत दंग होते. दरम्यान, काल गोलरिंगण सोहळ्या दरम्यान राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप गारटकर दोन तपानंतर एकत्र आले.
पालखी सोहळ्याचे शनिवारी पुणे जिल्ह्य़ातील शेवटच्या मुक्कामाकडे (सराटी) प्रस्थान होईल. इंदापूरपासून राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील पुणे-सोलापूर जिल्ह्य़ाच्या हद्दीपर्यंत पालखी सोहळ्यासोबत जाणार आहेत.