आंबेनळी घाटात वर्षभरापूर्वी घडलेल्या भीषण बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी घेतला. यानुसार १९ जणांना गट क आणि ड संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश आज काढण्यात आला असून त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांना कृषिमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.

मागीलवर्षी जुलैमध्ये कोकण विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्यूमुखी पडलेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी होती. त्यानुसार कृषी, वित्त, सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करून गट क व ड मधील १९ कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर नियुक्तीचा शासन आदेश काढण्यात आला.

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली होती, या बसमध्ये चालकासह एकूण ३४ जण होते. या ३४ जणांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाला होता. हे सगळे कर्मचारी प्रामुख्याने दापोलीचे होते. ३४ पैकी एका प्रवाशाने बस कोसळत असताना उडी मारल्यामुळे त्याचे प्राण वाचले होता. बस कोसळत असताना त्यांनी या बसमधून उडी मारली. त्यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले होते. यानंतर प्रकाश सावंत यांची चौकशी करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली होती. शिवाय मृतांच्या कुटुंबियांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले होते. बस कोण चालवत होते, हे समोर येणे गरजेचे आहे, असे या पत्रात म्हटले होते.