अलिबाग : परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. कृषी आणि महसुल विभागाने शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास २७ टक्के भात पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी ९२ टक्के क्षेत्रावर यावर्षी भातपिकाची लागवड करण्यात आली होती. जुन, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पिकही जोमाने आले होते. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे भात पिकावर अतिवृष्टीचे दुष्परीणाम झाल्याचे दिसून आले. तयार झालेले भातपिक नष्ट झाले, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे अद्याप पुर्ण झालेली नाहीत.

जिल्ह्यात यावर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत दिडशे टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ५ हजार  मिलीमीटरहून अधिक पाऊस जिल्ह्यात नोंदविला गेला आहे. ही  बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केली आहे.

‘ अतिवृष्टीने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अद्याप हे काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.’

– सुनील तटकरे, खासदार