पावसाअभावी निर्माण झालेली विदारक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तो राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. दुष्काळ लक्षात घेऊनच बँकेने ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला व्याज आकारू नये, अशी मागणीही या सभेत करण्यात आली.
बँकेची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदींसह अपवाद वगळता बँकेचे सर्व संचालक सभेला उपस्थित होते. सभेत ऐनवेळच्या विषयात संचालक उदय शेळके यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्याला सर्वानी सहमती दर्शवली.
सभेत थोरात यांनीच ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला व्याज आकारू नये, यादृष्टीने विशेष योजना आखण्याची मागणी केली. त्याला अनेकांनी सहमतीही दर्शवली. थोरात यांनी बँकेच्या कारभाराचे कौतुक केले. राज्यातील मोजक्या सक्षम जिल्हा बँकांमध्ये आपला समावेश होतो. ही आर्थिक सुबत्ता लक्षात घेऊनच बँकेने वरील निर्णय घ्यावा, असे त्यांनी सुचवले. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांना बिगरशेती (नॉन फार्म) कर्ज उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी आग्रही मत मांडले.
आपल्या जिल्हय़ात मराठवाडय़ापेक्षा विदारक दुष्काळ आहे, असे थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, मात्र त्याची आपल्याला आता सवय झाली आहे. त्यामुळे यावर फारशी ओरड होत नाही, हीच आपली अडचण आहे. केंद्र व राज्य सरकारला अजूनही दुष्काळाचे गांभीर्य उमगले नाही. दुष्काळामुळे येणार काळ अतिशय कठीण असून, यात राजकारण न आणता केवळ शेतकरी हित डोळय़ांसमोर ठेवून काम करावे लागेल. शेतकरी टिकला तरच देश टिकेल, हे सर्वानीच लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. ऐन दुष्काळातही जिल्हय़ातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेला ८२ टक्के वसुली दिली, ही मोठय़ाच कौतुकाची बाब आहे, असे ते म्हणाले.
सुरुवातीला गायकर यांनी बँकेच्या कारभाराचा आढावा घेतला. यंदा सभासदांना ९ टक्के लाभांशही त्यांनी जाहीर केला. पिचड, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार जयंत ससाणे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांची या वेळी भाषणे झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी अहवालवाचन केले. शंभर टक्के वसुली करणाऱ्या जिल्हय़ातील १८० सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी आभार मानले.
कर्डिले यांची टोलेबाजी
दुष्काळाच्या प्रश्नावर कर्डिले यांनी सभेत सरकारची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. या मुद्दय़ावरून ससाणे व थोरात यांच्यात चांगलेच सवाल-जबाबही रंगले. त्याने चांगलाच हशाही पिकला. सरकारची बाजू मांडताना कर्डिले यांनी आम्ही तुमच्यासारखीच निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अजून तीन-चार वर्षांनी कर्जमाफी जाहीर करू असे सांगितले. येत्या आठ-दहा दिवसांतच राज्य सरकार दुष्काळाचे धोरण जाहीर करील, असेही ते म्हणाले.