29 May 2020

News Flash

‘अजित पवारांशी संबंधित डेअरीकडून बारामतीमध्ये दूध उत्पादकांना कमी दर’

बारामतीमधील खासगी दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांना केवळ १९ रुपये दर देते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित डायमंड दूध डेअरीकडून खरेदी होत असल्याने त्यांना मिळणारा

| June 26, 2015 01:20 am

बारामतीमधील खासगी दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांना केवळ १९ रुपये दर देते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित डायमंड दूध डेअरीकडून खरेदी होत असल्याने त्यांना मिळणारा दर कमी आहे. तेथील दूध उत्पादकांनी सहकारी संघास दुधाची विक्री केली असती, तर तेथील शेतकऱ्यांनाही एक रुपया अधिकचा मिळाला असता, या शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बारामतीच्या दूध व्यवहाराकडे येथे पत्रकार बैठकीत बोलताना लक्ष वेधले.
बागडे यांच्या अध्यक्षतेखाली कारभार सुरू असणाऱ्या जिल्हा दूध उत्पादक संघात २०१४ साठी सहकारभूषण पुरस्कार मिळाला. या बद्दल केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. या दूध संघाचे मुख्यालय व संस्थांचा कारभारही आयएसओ प्रमाणित असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत सोसायटीमधील ३५ हजार सभासदांचा अपघात विमा काढण्याचा निर्णयही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त दुधाचा प्रश्न सरकारने आता निकाली काढला आहे. सहकारी दूध संस्थांकडे शेतकऱ्यांनी दूध विकल्यास २२ रुपये ५० प्रतिलिटर दर ठरविण्यात आला आहे. दूध अतिरिक्त आल्यास सरकार त्याची भुकटी बनवेल. यात व्यवहारात तोटा झाला तर सरकार सहन करेल, असे निर्णय पूर्वीच झाले आहेत.
काही खासगी कंपन्यांना दूध जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याला कोणीच काही करू शकणार नाही. मध्यंतरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली होती. विधिमंडळ कामकाजाचा काही भाग ठरवायचा होता, तेव्हा पवार यांनी हा विषय काढला होता. तेव्हा सहकारी दूध संघाकडून अडचण होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे बागडे यांनी सांगितले. या प्रश्नी विरोधी पक्षात असणाऱ्या, पण दूध व्यवसायात लक्ष घालणाऱ्या सर्वाची बैठक स्वत:च्या दालनात घेतल्याचे सांगत या क्षेत्रात सरकारचे निर्णय योग्य असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार बैठकीस औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:20 am

Web Title: decrease rate to milk procrastinatory in baramati by ajit pawar related dairy
टॅग Aurangabad,Milk
Next Stories
1 गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये जि.प. शाळांची दमछाक!
2 शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा गडकिल्ल्यांना संजीवनी द्या -राज ठाकरे
3 शाळांना इमारतीच नाहीत, बांधकामे रखडलेलीच
Just Now!
X