महसूल मंत्रिपद मिळवण्यासाठी नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याचा आरोप करीत आणि मला कोणतेही पद नाही मिळाले तरी चालेल, कोकणच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, असे सांगत आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत यांच्यासह केसरकर यांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर चौफेर हल्ला केला. ते म्हणाले, राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी अशी सध्या कोकणातील जनतेची अवस्था झाली आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तसे घडले नाही. बाळासाहेबांना त्रास देणाऱयांना शिवसेनेत घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे त्यांनी आमची मने जिंकल्याचेही केसरकर यांनी सांगितले. तुझ्या जागी मी असतो, तर मी कधीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला असता, असे स्वतः अजित पवार यांनी मला सांगितल्याचेही केसरकर म्हणाले.
शिवसेनेत आल्यानंतर आता आपण संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळेच कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असेही केसरकर यांनी सांगितले.