राष्ट्रवादीला दिलेल्या पाठिंब्याचा सेनेवर परिणाम शून्य

कोल्हापूर : नारायण राणे यांना ज्या व्यक्तींनी पदे दिली, मोठे केले, त्यांच्यावरच ते घसरत आले आहेत. रायगडमध्ये राणेंनी राष्ट्रवादीला दिलेल्या पाठिंब्यामुळे सेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मत गृहराज्यमंत्र्यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

रायगड  विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांची युती झाली आहे, पण भाजपमुळे राज्यसभेत पोहोचलेले नारायण राणे यांनी या निवडणुतीत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे. राणे यांच्या या समीकरणावर  शिवसेनेचे कोकणातील मंत्री आणि नेते केसरकर यांनी भूमिका व्यक्त केली.

या विषयावर बोलताना केसरकर यांनी राणे यांची प्रवृत्ती माहीत असल्याने त्यांच्यावर अधिक बोलून मी माझा वेळ घालवणार नाही, असे सांगितले. पण लगेचच त्यांनी राणे यांच्यावर तोफ डागली. राणे हे कोणत्या पक्षाचे घटक आहेत हे मला माहीत नाही, पण नेहमी ते स्वार्थी भूमिका घेत असतात. पद देणाऱ्यांवर ते घसरत आले आहेत.  येत्या काही दिवसांत आपल्याला स्वच्छ आणि गुन्हेगारमुक्त राजकारणी दिसून येतील असा टोलादेखील त्यांनी लगावला.

हिमांशू रॉय यांनी आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये अशी नोट लिहिली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, सरकार नेहमीच कर्तव्यदक्ष पोलिसांच्या पाठीशी उभे राहात आले आहे. रॉय यांनीदेखील राज्यातील महत्त्वाच्या गुन्ह्यंचा छडा लावला होता. मात्र कर्करोगाने  गेल्या दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या रॉय यांनी आज गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंह यांनी केलेले आरोप केसरकर यांनी फेटाळले.