|| प्रशांत देशमुख

निवडणुकीत पराभूत होण्याचे शल्य न ठेवता पराभूत उमेदवारांनी सहजतेने आपल्या व्यवसायात परत झोकून दिल्याची स्थिती दिसून येते. विजयी झालेले आमदार सत्ता स्थापनेचा खेळ मुंबईत तळ ठोकून बघत आहे. अनेकांना नव्या सत्ता रचनेत वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांचे उद्दिष्ट सफ ल झाले. मात्र पराभूत बडय़ा उमेदवारांना पराभवानंतर कार्यकर्त्यांची समजूत भेटीगाठी घेऊन करावी लागत आहे. त्यात काही दिवस गेल्यानंतर आता हे उमेदवार आपल्या कामाला लागले. तीनवेळा चांदूर रेल्वेतून आमदार झालेले प्रा. वीरेंद्र जगताप यावेळी पराभूत झाले. मात्र निकालाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी महाविद्यालय गाठून सेवेत सुरुवात केली. वध्रेकर असलेले जगताप आर्वी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत झाल्यानंतर काहीच वर्षांत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा त्यांनी महाविद्यालयातून रजा घेतली होती. आता पराभूत झाल्यानंतर ते पूर्ववत प्राध्यापक झाले. पंधरा वर्षे या पेशापासून दूर राहिलो असलो तरी वाणिज्य विषयाचे वाचन सुरूच होते. त्यामुळे आताही तेवढय़ाच उत्साहात मुलांना शिकवायला आनंद वाटेल, असे ते म्हणाले.

हिंगणघाट येथील पराभूत माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे हे हाडाचे शेतकरी म्हणून ओळखल्या जातात. निकाल लागल्यानंतर लगेचच ते तालुक्यातील बोपापूरच्या शेतीवर पोहोचले. निवडणूक दरम्यान गडी माणसावर सोपवलेली शेती चांगल्या अवस्थेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले असले तरी चणा व मूग पिकाची स्थिती चांगली आहे. एकरी दहा क्विंटल कापसाचे पीक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच शंभरावर गाई-म्हशी व अन्य पशूधन आहेत. त्यात माझा भरपूर वेळ जातो. जिल्हय़ात पक्षाची नव्याने बांधणी करायची असल्याचे ते म्हणाले. आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची विचारपूस सुरू केली. वध्रेतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार शेखर शेंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या दैनंदिन भेटीगाठी आटोपल्यानंतर स्वत:च्या व्यवसायात झोकून दिले. देवळीतील बंडखोर भाजप उमेदवार राजेश बकाणे यांनी समाधानकारक लढत दिल्याची भावना व्यक्त केली. पक्षाने मला निलंबितही केले नाही. तसेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही काढली नाही. त्यामुळे पक्षकार्य सुरू असल्याचे ते म्हणाले. गॅस एजंसीच्या कार्यात त्यांनी परत स्वत:ला गुंतवून घेतल्याचे पाहायला मिळाले. येथील सेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी निवडणुकीच्या धबडग्यातून बाहेर पडल्यानंतर काही काळ स्वत:ला दैनंदिन घडामोडीपासून दूर ठेवले. पुढे काय, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. एकूणच पराभूर उमेदवारांनी दैनंदिन व्यवसाय सुरू ठेवतानाच आगामी पाच वर्षांत पक्षाचेही कार्य नेमाने सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.