देशभर नरेंद्र मोदींच्या लाटेत भल्या-भल्यांची पडझड झाली. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून मतदारांनी आपणास भरभरुन मते दिली. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवणे आवश्यक होते. त्याचा परिणाम काँग्रेस आघाडीच्या यशावर झाला, असे सांगून पराभवाने खचून जाणार नाही. चुका सुधारुन पुन्हा मतदारांसमोर जाईल, असा विश्वास पराभूत उमेदवार सुरेश धस यांनी व्यक्त केला. खासदार गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे व त्यांनी जिल्हय़ात विकासकामे करावीत, अशा शुभेच्छाही धस यांनी दिल्या.
लोकसभेच्या बीड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांचा १ लाख ३६ हजार मताधिक्क्याने भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी पराभव केला. निकालानंतर प्रथमच आष्टी येथे धस यांनी पत्रकारांसमोर निकालाचे मनमोकळे विश्लेषण केले. लोकसभा निवडणुकीवर मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याचा काँग्रेस आघाडीच्या यशावर परिणाम झाला. विधानसभेपूर्वी हा प्रश्न निकाली लागेल, तसेच ऐन निवडणूक तोंडावर गारपीट झाली. प्रशासनाने वेळेवर पंचनामे करुनही आर्थिक मदतीचा केवळ पहिला हप्ता निवडणुकीपूर्वी मिळाला. मात्र, दुसरा हप्ता वेळेवर देता आला नाही, ही बाब सरकारच्या अंगलट आली.
निवडणुकीत भाजपची लाट नसून केवळ मोदी यांची लाट होती. मोदी फॅक्टर सर्वात मोठा ठरला. परिणामी ओबीसी समाजातील इतर छोटय़ा जातींनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येते. देशात मोदींची लाट असताना बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, आमदार, कार्यकत्रे यांनी प्रामाणिक काम केले. त्यामुळे भाजपशी झुंज देता आली. या पराभवाने खचून जाणार नाही.