कुंपणच शेत खाते ही म्हण पिंपरीतल्या चोरीसंदर्भात शब्दशः खरी ठरली आहे. कारण बेहराराम पुरोहित या डिलिव्हरी बॉयनेच सोन्याची ४५ बिस्किटे लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुंबईतल्या झवेरी बाजार या ठिकाणी असलेल्या दोन ज्वेलर्समधून बेहरराम पुरोहितने ४५ सोन्याची बिस्किटे घेतली. या सगळ्याची चोरी झाल्याचा बनाव बेहराराम पुरोहितने रचला आणि पोलिसात जाऊन ही बिस्किटे अज्ञात चोरांनी लुटल्याची तक्रार दाखल केली. मात्र या सगळ्या प्रकरणात बेहरारामचाच हात असावा असा संशय पोलिसांना सुरुवातीपासून होता. जो खरा ठरला. या प्रकरणी मुंबईतून आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहराराम पुरोहित या डिलिव्हरी बॉयने त्याच्याजवळ असलेली साडेचार किलो वजनाची बिस्किटे काही चोरांनी चोरल्याचा आरोप केला होता. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने या संबंधीची तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवताच पोलिसांनी शोध सुरु केला. सुरुवातीपासूनच पोलिसांना बेहरारामवर होती. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मुंबईतून दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. आणखी या प्रकरणात कोणाचा हात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

बेहराराम हा मागील ८ वर्षांपासून समृद्धी ज्वेलर्समध्ये काम करत होता. दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडून त्याने राजस्थानमध्ये व्यवसाय थाटला होता. मात्र या व्यवसायात तो अपयशी झाला होता. तसेच त्याचा पत्नीसोबत घटस्फोटही झाला. चार महिन्यांपासून तो पुन्हा एकदा समृद्धी ज्वेलर्समध्ये काम करू लागला होता. त्यामुळे त्याच्यावरच पोलिसांना पहिला संशय होता जो खरा ठरला.