कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद न्यायालयात सुरू असताना केंद्र सरकारने बेळगावचे नामकरण बेळगावी करण्यास दिलेली परवानगी चूकच असल्याची भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. केंद्र सरकार जरी आपले असले तरी न्यायालयाचे कामकाज सुरू असताना बेळगावी असे नामकरण करण्यास दिलेली मंजुरी चूक होती. मग असे असेल तर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. तशी परवानगी घ्यावी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या खड्डेमुक्तीसाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून पैसे आणा, असा सल्ला दिला. औरंगाबाद शहरातील ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम मराठवाडय़ाची अस्मिता’ या संग्रहालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पालकमंत्री रामदास कदम यांनी जाहीर कानपिचक्या दिल्या.
महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारचा दौरा राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानला जात होता. रविवारी भाजप-सेनेच्या प्रमुख नेत्यांची विशेष बैठक झाली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात शिवसेनेने नामांतराचा मुद्दा पुन्हा रेटला. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘औरंगाबाद असे म्हटले, की तुम्ही का उसळता? खडकीचे औरंगाबाद झाले, तेव्हा कधी परवानगी लागली होती. औरंगजेबाच्या स्मृती किती दिवस जवळ बाळगायच्या? ज्यांना त्या बाळगायच्या असतील त्यांनी पाकिस्तानात जावे.’ राज्यात आणि केंद्रात आता आपले सरकार आहे, तेव्हा शहराच्या नामांतराच्या परवानगीसाठी प्रयत्न करा, असेही ठाकरे म्हणाले. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर खड्डेमुक्त करावे लागेल. त्यासाठी पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नव्या योजनेचा लाभ घ्या. तेथून पैसा आणा, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, संदीपान भूमरे, हर्षवर्धन जाधव आदींची या वेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राजकीय फटकेबाजीही रंगली. पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, ‘या शहराच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली गेली नसती तर कदाचित हे संग्रहालय उभारले गेले नसते.’ महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा संदर्भ त्यांच्या वाक्यात होता. या वेळी खासदार खैरे यांच्यावर शिवसेनेत नाराजी असल्याने त्यांना जाहीर कानपिचक्याही पालकमंत्री कदम यांनी दिल्या. कदम भाषणाला उभे राहिले तेव्हा खासदार खैरे हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत होते. त्यांना सुनावत कदम म्हणाले, ‘मला आता बोलू द्या. माझ्या आणि साहेबांमध्ये जास्त वेळ येऊ नका. पण एक नक्की, मला इथे पालकमंत्री म्हणून पाठवले नसते तर हे संग्रहालय झाले नसते.’ संग्रहालयाच्या वर आणखी एक मजला उभा करावा, यासाठी पालकमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी खासदार खैरे यांनी केली होती. त्याला उत्तर देत पालकमंत्री कदम म्हणाले, वरचा मजला व्हावा, ही उद्धव ठाकरे यांचीच इच्छा आहे. त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला जाईल. खैरेंची साक्ष सोडूनदेखील मी हे आश्वासन देतो, असे ते म्हणाले.
महापालिकेच्या कारभारावर हरिभाऊ बागडे यांनीही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, ‘शहरात वाहतुकीची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे. पुढील ५० वर्षांची आखणी करून बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणखीही प्रश्न आहेत, पण त्यावर मी बोलणार नाही.’ अंतर्गत कुरघोडय़ा आणि जाहीर उखाळय़ापाखाळय़ांनी उद्घाटनाचा कार्यक्रम रंगला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2015 रोजी प्रकाशित
‘औरंगाबादच्या नामांतरासाठी परवानगी मागा’
कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद न्यायालयात सुरू असताना केंद्र सरकारने बेळगावचे नामकरण बेळगावी करण्यास दिलेली परवानगी चूकच असल्याची भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.

First published on: 09-02-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand change name of aurangabad