संसदेचे कामकाज रोखून धरण्याऱ्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात रविवारी जिल्ह्य़ात पडसाद उमटले. कोल्हापूर व इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत काँग्रेसचा निषेध नोंदविला.
संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापूसन काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांना ललित मोदी प्रकरणावरून लक्ष्य केले आहे. याच मुद्दय़ावरून तीन आठवडय़ांहून अधिक काळ संसदेचे कामकाज काँग्रेस पक्षाने रोखून धरले आहे. काँग्रेस पक्षाची ही भूमिका हटवादी स्वरूपाची असल्याचा आरोप करत भाजपाने रविवारी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येथील भाजपा कार्यकर्त्यांनी हाताला काळया फिती बांधून बिंदू चौकातील कार्यालयापासून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस खासदारांना राक्षसाच्या रूपात दाखविणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. येथे सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष महेश जाधव, गोकूळचे संचालक बाबा देसाई, नगरसेवक आर.डी.पाटील, सरचिटणीस अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मंत्री पाटील यांनी काँग्रेसच्या हटवादी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून प्रतिकार केला जाईल, असा इशारा दिला.
इचलकरंजीत निदर्शने
इचलकरंजी भाजपाच्या वतीने कॉ. के.एल. मलाबादे चौकात शहराध्यक्ष विलास रानडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. वैशाली नाईकवडे, धोंडिराम जावळे, बाबा नलगे, तानाजी रावळ, प्रशांत शालगर, ऋषभ जैन यांची काँग्रेसची वाभाडी काढणारी भाषणे झाली.