25 September 2020

News Flash

युती झाली तरी, कोकणात भाजप कार्यकर्ते थंडच

भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, शिवसेनेने आम्हाला गृहीत धरू नये.

(संग्रहित छायाचित्र)

सतीश कामत, रत्नागिरी

अलीकडेपर्यंत एकमेकांच्या नावाने खडे फोडणाऱ्या शिवसेना आणि भाजपची नेत्यांच्या पातळीवर ‘युती’ झाली असली तरी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या मतदारसंघात भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह बहुसंख्य कार्यकर्ते अजूनही ‘आदेशा’ची वाट पाहत थंड बसले आहेत.

युतीची घोषणा करण्यासाठी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेचा विरोध असलेल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करीत असल्याचे जाहीर केले. हा विषय लावून धरलेले सेनेचे आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांनी त्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी भाजपच्या कोणाही पदाधिकाऱ्यांना त्यांनी बरोबर घेतले नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याच्या वेळी या चुकीची भरपाई करण्यासाठी भाजप नेत्यांची नावे सर्वत्र ठळकपणे लावण्यात आली होती. पण त्यांच्यापैकी कोणीही कार्यक्रमाकडे फिरकले नाही. खासदार राऊत यांना या संदर्भात कधीही विचारले तरी, भाजपचे वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ‘गैरसमज’ दूर करतील, एवढेच ते म्हणत असतात. म्हणजे, साडेचार वर्षांत जिल्ह्य़ातील सत्तेची पदे वाटताना भाजपवर अन्याय झाला असे ते आजही मानायला तयार नाहीत. दुसरीकडे भाजपचे या मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी गेल्या आठवडय़ात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकांमध्ये पक्षकार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेत, स्थानिक सेना नेत्यांकडून या संदर्भात ‘करार’ करून घेण्याची हमी दिली आहे. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह प्रमुख पदाधिकारीच सेना उमेदवाराच्या विरोधात असल्यामुळे लाड यांनी, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर या कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. १५ मार्चपासून युतीचा संयुक्त प्रचार सुरू होईल, असे राऊत यांनीही जाहीर केले होते. पण त्यानंतर अजून बैठकीची तारीख पुढे जात राहिल्याने याबाबतची अस्वस्थता वाढू लागली आहे.

स्थानिक पातळीवर सेना आणि भाजप यांच्यातील कलगी-तुरा रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीलगतच्या कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाटय़ावर आला. शिवसेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत असून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष इत्यादी सर्व विरोधी पक्ष ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. भाजपच्या मतदारांनी या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना मतदान न करता या आघाडीच्या उमेदवारांना करावे, असे उघड आवाहनच भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे. त्यामुळे  ‘युतीधर्मा’ला तडा गेला आहे.

या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे जिल्हा प्रवक्ता दीपक पटवर्धन म्हणाले की, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विचार करून युतीचा निर्णय झाला आहे. पण  स्थानिक पातळीवरील असंतोषाकडेही वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचे निराकरण झाल्याशिवाय कार्यकर्ते झटून कामाला लागणार नाहीत. यापुढे सेनेबरोबर फरपटत जाण्याची त्यांची इच्छा नाही. अर्थात वरिष्ठांनाही या गुंतागुंतीची कल्पना आली असून लवकरच त्याबाबत सन्मान्य तडजोड होईल, असा विश्वास आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, शिवसेनेने आम्हाला गृहीत धरू नये. ग्रामपंचायत किंवा विधानसभेच्या निवडणुका अजून व्हायच्या आहेत. कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीतही सेनेच्या स्थानिक नेत्यांचा खोडसाळपणा चालूच आहे. युतीची घोषणा झाल्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीही सुधारणा झालेली नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पदे, सदस्यत्व देण्याबाबत मौन बाळगून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींबाबत भाजप कार्यकर्ते अतिशय नाराज असून त्यांना समजावणे कठीण जाणार आहे.

रुसवा कायम : या मतदारसंघाचे मतदान २३ एप्रिलला असल्यामुळे भाजप नेते-कार्यकर्त्यांचा हा रुसवा दूर करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, अशी सेनेच्या गोटातील भावना आहे. कोकणात अनन्यसाधारण महत्त्व असलेला शिमग्याचा सण झाल्यानंतर याबाबतच्या प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला तर माने किंवा जठार फार ताणून धरू शकणार नाहीत, याचीही सर्वाना कल्पना आहे. त्यामुळे राज्य पातळीवर हात मिळवले गेले असले तरी कोकणातील या मतदारसंघाच्या पातळीवर विजय निश्चित करून ‘मोदींचे हात बळकट करण्यासाठी’ सेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वजन खर्ची घालावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:02 am

Web Title: despite shiv sena alliance bjp workers in konkan not active
Next Stories
1 वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी
2 हंडाभर पाण्यासाठी वणवण
3 वनखात्याच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्ला
Just Now!
X