नागपूरमधल्या एका ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करुन कारवाई केली पाहिजे असं पत्र आणि त्यावर तातडीने काढलेला निष्कर्ष आणि त्यामुळे कारवाईच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह हा विषय लिहून फडणवीस यांनी पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. नागपुरात व्हायरल एका कथित संभाषण ध्वनिफितीची चौकशी करण्याची विनंती मी आपणाला केले आहे. त्या पत्राचे अपेक्षित उत्तर प्राप्त झालेले नाही. तरीही त्याला लेखी उत्तर आपल्या लेटरहेडवर दिल्याचे समाजमाध्यमातून समजले. नागपुरातल्या वृत्तपत्रांनीही आपण त्या पत्राला दिल्याचं वृत्त दिले. या पत्रात आरोपीचं नाव आपण नमूद केले आहे. तसंच त्याचे चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधाकर देशमुख यांच्यासोबत फोटो असल्याने तो भाजपाचा कार्यकर्ता आहे, असा निष्कर्ष काढला आहे. हा पक्षातील अंतर्गत वादाचा विषय असल्याचंही आपण त्या पत्रात नमूद केलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सदर आरोपीचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यातील मंत्री सुनील केदार, नितीन राऊत आणि आपण स्वतः यांच्यासोबतचीही छायाचित्रं व्हायरल होत आहे. काही छायाचित्रांमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टाही त्याच्या गळ्यात आहे. असे असले तरीही तो कुणाचा कार्यकर्ता आहे असे आम्ही म्हणणार नाही. आपण सारेच राजकीय आणि सामाजिक कार्यात काम करत असताना अनेक लोक आपल्याला भेटतात. असे लोक आपल्यासोबत फोटो काढण्याची विनंतीही करतात. आपण ते फोटो काढू देतो. संबंधित व्यक्तीच्या जीवनाशी आपला काहीही संबंध नसतो. त्यामुळे केवळ फोटो आहेत म्हणून तो कुणाचा कार्यकर्ता ठरत नाही.

सदर ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये आल्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली भेट झाली असता अशी ध्वनीफित फिरत असल्याचे मी आपल्याला प्रत्यक्ष सांगितले होते असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.