मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होणार की नाही, याची चिंता करू नका, यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्यावर सोडून द्या, निवडणूक युद्धाची तयारी ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना शनिवारी येथे केले.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात भाजपच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, प्रवीण पोटे, खासदार संजय धोत्रे, रामदास तडस, पश्चिम विदर्भातील भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेसोबत युती झाली नाही, तरी आपण काय करू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. पण, आता केवळ निवडणुकीपुरता विचार न करता गावागावांत भाजपची ताकद वाढवण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या विविध पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण युद्धाची तयारी नेहमी ठेवली पाहिजे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाचा मालक हा कार्यकर्ता आहे. तो अतिसंवेदनशील आहे. पण सतत विरोधी पक्षात राहण्याच्या सवयीमुळे नकारात्मक भाव निर्माण झाला आहे.

दहा कामांपैकी पूर्ण झालेल्या सात कामांचा विचार न करता आपण अपूर्ण तीन कामांविषयी चिंता करतो. ते सोडून आता सरकारची कामे लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचतील, याकडे लक्ष द्या.

कर्जमाफीची योजना कशा पद्धतीने अयशस्वी होईल, याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा सहकारी बँकांनी लक्ष दिले. या पक्षांच्या ताब्यातील बाजार समित्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. शेतमाल खरेदीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यात आले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळू न देता, त्यांना लुबाडण्याचे काम झाले आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या पक्षांचे कारनामे पक्ष कार्यकर्त्यांनी उघडे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले.