राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राणे केलेल्या ट्विटवरून बरीच चर्चा रंगली. या निलेश राणे यांनी दावा केलेल्या गुप्त बैठकीवरील पडदा दूर सारत उदय सामंत यांनी काहीसा नाराजीचा सूर लावला. मला विरोधी पक्षनेते देव्रेंद फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी मित्रत्वाच्या नात्याने एक सल्ला द्यायचा आहे, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, तेव्हा रत्नागिरी गेस्ट हाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले,’ असं निलेश राणे यांनी ट्विट केलं. त्यांच्या ट्विटनंतर वेगवेगळी राजकीय चर्चा सुरू झाली. चर्चा नाट्यमय वळण घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण विषयावरील पडदा दूर सारला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना त्यांनी सल्लाही दिला.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “बैठकीबद्दल सांगायचं, तर ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली. पहाटे शपथविधी झाला आणि सकाळी गौप्यस्फोट झाला, तर मी त्याला गौप्यस्फोट समजू शकतो. पण सहा दिवसांपूर्वी मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर १ वाजता पोहोचलो. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी आले. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे, जी आम्हाला शिकवली गेली. त्याप्रमाणे मी त्यांचं स्वागत केलं,” असं सामंत म्हणाले.

“फडणवीसांना भेटलो, यात काही पाप नाही. मी एकटा कुणाला भेटलो नाही. ज्यांनी कुणी आरोप केलाय, ते खूप मागे उभे होते. तिथे प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड होते आणि त्यानंतर ते (निलेश राणे) होते. त्यामुळे कदाचित बघण्यात फरक होऊ शकतो. पण फडणवीस माझ्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना भेटलो असेल, मी गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. पण मला देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांना मित्र म्हणून सल्ला द्यायचा की, अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्यांना जर आपण सोबत ठेवणार असाल, तर भविष्यातील महाराष्ट्राचं राजकारण काय असू शकतं याची प्रचिती आली असेल,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.