राज्यातील पाच व्याघ्रप्रकल्पांत सुरक्षा उपकरणे; विद्यार्थ्यांची निर्मिती

नागपूर : जिवंत विद्युत तारांचा शोध घेणारी २० उपकरणे महाराष्ट्राच्या वनखात्यात दाखल झाली असून राज्यातील पाच व्याघ्रप्रकल्पांमध्ये ही उपकरणे वापरण्यात येणार आहेत. जिवंत विद्युत तारा सोडून होणारी वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी या उपकरणांची मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हे उपकरण विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.

‘अटल इनोव्हेशन सेंटर’ आणि आंध्र प्रदेशातील ‘श्री कृष्णदेवराय विद्यापीठा’ने डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया यांच्या सहकार्यातून २०१९ मध्ये एक स्पर्धा आयोजित के ली होती. या स्पर्धेत ‘जिवंत विद्युतप्रवाह कसे शोधायचे’ यांसारखी आव्हाने विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. या स्पर्धेत कु प्पम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ही संकल्पना मांडली. त्यांना नमुन्यादाखल एक उपकरण तयार करण्यास सांगण्यात आले. २०२० मध्ये महाराष्ट्र, तसेच मध्य प्रदेशच्या जंगलात याची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर या उपकरणात विजेरी (टॉर्च) असावा, ते कमी अंतरावरून वापरता यावे, उपकरण अधिक जड नको, अशा सुधारणाही सुचवण्यात आल्या. या सूचनांचा अंतर्भाव करून व्यावसायिक पातळीवर ‘कुप्पम इलेक्ट्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ या स्टार्टअप कं पनीच्या माध्यमातून उपकरण तयार करण्यात आले.

‘डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया’चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्य भटकर म्हणाले, ‘या उपकरणामुळे गस्तिपथकाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. वन्यजीव संरक्षण व संवर्धनात आणखी चांगले काम करता येईल. या उपकरणामुळे वनखात्यातील तंत्रज्ञान वापराचे महत्त्व आणखी वाढले आहे.’

कार्य कसे?

जिवंत विद्युतप्रवाह कु ठे सोडण्यात आला आहे याचा या उपकरणाच्या माध्यमातून तीन मीटर अंतरावरून शोध घेता येतो. उपकरणात त्यावेळी ‘बीप बीप’ असा आवाज येतो. यात टॉर्च व बॅटरी इंडिके टरही आहे. उपकरणाची बॅटरी संपत आल्यास लगेच कळते. भ्रमणध्वनीच्या चार्जरनेदेखील हे उपकरण चार्ज होते आणि ११-१२ तास चालते.

फायदा काय? तृणभक्षी प्राणी पिकांचे नुकसान करतात

म्हणून शेतकरी कुंपणावर जिवंत विद्युतप्रवाह सोडतात. शिकारीही वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी याचा वापर करतात. यात कित्येकदा शेतकरी आणि गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचाही मृत्यू होतो. हे उपकरण वनक्षेत्रात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांसाठीही सोयीचे आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश

आणि छत्तीसगड राज्यांतही जिवंत विद्युतप्रवाह सोडून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतच होतो. या स्पर्धेतून आम्हाला त्यावरचा पर्याय सापडला. मात्र, अजूनही आम्ही त्यात काय आणखी नवीन करता येईल या प्रयत्नात आहोत.

सौमन डे, समूहप्रमुख, मध्य भारत, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया