शेतकऱ्याच्या विनंतीवरून शासनाच्या निषेधार्थ

बोंडअळीने कापूस पोखरलेला तर दुसरीकडे वीज बिल भरण्याचा तगादा, या कात्रीत कित्येक दिवसांपासून सापडलेल्या पवनारच्या शेतकऱ्यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे धावले. मग दोघांनीही मिळून कापूस पिकावर ट्रॅक्टर फिरवत सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्ला बोल’ यात्रेच्या सातव्या दिवशी ही नाटय़मय तेवढीच ग्रामीण भागातील अस्वस्थता टिपणारी घटना घडली.

‘हल्ला बोल’ यात्रा गुरुवारी सकाळी पवनारला पोहोचली. येथील शेतकरी श्रीकांत तोटे हे यात्रेला सामोरे गेले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांना शेतीची हानी पाहण्यास सांगितले. दहा एकरातील कापूस बोंडअळीने पोखरला गेला होता. शंभर  क्विंटलचे उत्पादन अपेक्षित होते. पण आता काहीच क्विंटल हाती लागल्यावर त्याचा वेचाईचा खर्चच अधिक येणार. त्यापेक्षा नष्ट केलेले बरे अशी भावना व्यक्त करीत तोटे यांनी या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याने मुंडे व सुप्रिया सुळेंना या कामात मदत करण्याची विनंती केली. त्यावर मुंडेंनी नांगर फिरवू नको. जे आहे ते पीक विकून गरज भागव. आपण सरकारला तुझी व्यथा सांगू, असे सुचवूनही शेतकऱ्याने ऐकले नाही. तुम्ही माझ्या दु:खात सहभागी होणार नसाल तरीही मी ट्रॅक्टर फिरविणारच आहे. तुम्ही मदत केली तरच सरकार खडबडून जागे होईल. माझ्या इतर शेतकरी बांधवांना तरी मदत मिळेल. अशा विनंतीवर मुंडे व सुप्रिया सुळे यांनी काही क्षण कापसाच्या पऱ्हाटीवर ट्रॅक्टर फिरवले.

याचदरम्यान मुंडे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्याशी संर्पक साधला. तसेच तहसीलदारांशी बोलणे केले. पण पंचनाम्याबाबत ठोस उत्तर मिळाले नाही. कृषी अधीक्षकांनी याविषयी माहिती घेत असल्याचे उत्तर दिले.

‘काळाकुट्ट दिवस’

‘लोकसत्ता’शी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, उभ्या पिकात नांगर फिरविणे, ही म्हण मी फक्त ऐकली होती. पण दुर्दैवाने आज मलाच तो कित्ता गिरवावा लागला. न सोसणारे हे दु:ख आहे. पण सरकारचे याकडे लक्षच नाही. पंचनामे नाही. पाहणी नाही व मदतीचा हातही दिसत नाही. माझ्या आयुष्यातील हा काळाकुट्ट दिवस होय, अशी भावना मुंडेंनी व्यक्त केली.