03 December 2020

News Flash

धनंजय मुंडे समर्थकांकडून मठाधिपतींना धमक्या

भगवानगडावर दर्शनास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला घोषणाबाजी केल्यामुळे लोक चिडले.

| January 10, 2015 03:21 am

भगवानगडावर दर्शनास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला घोषणाबाजी केल्यामुळे लोक चिडले. मात्र, आपणच लोकांच्या तावडीतून धनंजयला मागच्या दाराने सुरक्षित बाहेर काढले. पण या घटनेनंतर मला सातत्याने मोबाइलवर धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याने आपण पाथर्डी पोलिसांत रितसर तक्रार दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी यास होकार दिल्याची माहिती भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री यांनी येथे बोलताना दिली.
बीडच्या हद्दीवरील श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सायंकाळी शहरात नीलेश आघाव यांच्या निवासस्थानी पत्रकार बठक घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. शास्त्री म्हणाले, की भगवानगड हा सर्व जाती-धर्माच्या भक्तांचा गड आहे. या वर्षी संत भगवानबाबा यांच्या समाधीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान झाला. विरोधी पक्षनेते मुंडे सप्ताह झाल्यानंतरही दर्शनासाठी गडावर येऊ शकले असते. मात्र, जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी त्यांनी ५ जानेवारीला गडावर येण्याचे ठरवले. अकराच्या सुमारास सभामंडपात कथा चालू होती. मोठय़ा संख्येने भाविक बसले होते. या वेळी मुंडे येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लोक चिडले व त्यांनी धाव घेतली. परिस्थिती लक्षात घेऊन आपणच धनंजय यांना सुरक्षित ठिकाणी थांबवले. लोकांना शांत करून मागच्या रस्त्याने धनंजय यांना बाहेर जाण्यास मदत केली.
आपण लोकांना शांत केले नसते, तर धनंजय परत सुरक्षित जाऊ शकले नसते, इतके लोक चिडले होते. या घटनेनंतर सुरेश मुंडे नावाच्या व्यक्तीने आपल्याला मोबाइलवर तुम्हीच धनंजयच्या गाडीवर दगडफेक करण्याचे सांगितले. यापुढे गडावर इतर कोणीही नेता येता कामा नये अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर सातत्याने काही लोक स्थानिक दूरध्वनीवरून धमक्या देत आहेत, तर जि.प. समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी महासांगवीत आपला पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. एकूणच या प्रकारांमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला असून आपण पाथर्डी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही पोलीस संरक्षणाची मागणी केली असून ती मान्य करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
मागील १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. मात्र, आपल्याला कोणत्याच पुढाऱ्याने त्रास दिला नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर या समाजाला एकत्रित येण्याचे गड हेच ठिकाण आहे. त्यामुळे कोणी राजकारण करू नये, असे आवाहनही शास्त्री यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 3:21 am

Web Title: dhananjay munde followers threats bhagwangad mahant
टॅग Dhananjay Munde
Next Stories
1 भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात ७० हिंदू संमेलने
2 गडचिरोलीचे पालकमंत्री होऊनही राजे अंब्रीशरावांना राजवाडा सोडवेना
3 कॉम्रेड नाना मालुसरे संस्थेचे दीपस्तंभ पुरस्कार जाहीर
Just Now!
X