परळी येथील संत जगन्मित्र सहकारी सूत गिरणीने बीड जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा अटकपूर्व जामीनाच्या अंतरिम आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली. यामुळे धनंजय मुंडे यांना पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी पोलीस ठाण्यात मुंडे आणि सूत गिरणीच्या तत्कालिन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत गिरणी संचालक मंडळाने  बीड जिल्हा बॅंकेकडून कर्ज मंजूर करून घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सूत गिरणीकडून बॅंकेला देण्यात आलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे बॅंकेच्या व्यवस्थापकांनी २०१३ मध्ये परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही चेक बाऊन्स झाल्यामुळे धनंजय मुंडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. याच अंतरिम आदेशाला सोमवारी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे परळी पोलीस धनंजय मुंडे यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.