परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली गुंडगिरी कॅमेरात कैद झाली आहे. गाड्यांची तोडफोड करुन एका व्यापाऱ्याला मारहाण करणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे स्थानिक आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील टॉवर चौक परिसरामध्ये मुंडे समर्थकांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंडे समर्थकांनी या चौकामधील गाड्यांची केलेली तोडफोड केली तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली. हा सर्वप्रकार या परिसरामध्ये बसवलेल्या वेगवगेळ्या सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यातील व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. काठ्या आणि रॉडने देशमुखांवर कराड यांनी हल्ला केला. जखमी झालेल्या देशमुख यांना परळीच्या शसकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. कराड हे मुंडेचे जवळचे कार्यकर्ते समजले जातात.

देशमुख यांना मारहाण करणाऱ्या गणेश कराड आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात संभाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मुंडे यांच्या समर्थकांनी अशाप्रकारे भरचौकात तोडफोड आणि हणामारी केल्याने या प्रकरणाची परळीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.