देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेली परिवर्तन यात्रा पुण्यात आली आहे. पुण्यातील मंचर येथील सभेला संबोधित करताना मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते.

नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की नवीन सुनबाई खूप काम करतेय. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त, अशी टीका मुंडे यांनी मोदींवर केली आहे. मंचरमधील परिवर्तन यात्रेची सभा ही थोडी वेगळी भासली. इतर सभांप्रमाणे या सभेत स्थानिक प्रश्नांबाबतचे एकही निवेदन आलेले नाही. एक निवेदन आलं ते बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबतचं. आदरणीय दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विकासाचा, त्यांच्या नेतृत्वाचा लोकांनी मनापासून स्वीकार केला आहे, असे ते म्हणाले.

आदरणीय आण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटले. त्यांची प्रकृती खालावत आहे. लोकांच्या मागण्यांसाठी आण्णा हजारेंनी मोदींना ३६ पत्रं लिहिली. मोंदीकडून फक्त ‘धन्यवाद’ असे उत्तर पाठवले गेले. मोदींना #pubgwala चे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलता नाही, असा टोला यावेळी मुंडे यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. आनंद तेलतु़ंबडे यांना वारंवार अटक केली जाते, का सुरू आहे हे? ज्यांच्या घरात पुस्तकं सापडली त्यांना अटक, मात्र कुलकर्णी यांच्या घरात शस्त्रसाठा सापडला त्यांना सुटकेचा मार्ग दाखवला जातो. हे सरकार परत एकदा मनुवाद आणू पाहात आहे.