इस्लामपूर शहरात सामान्य नागरिकाबरोबरच व्यावसायिकांना वेठीस धरून गुंडगिरी करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड काढण्यात आली. दहशत माजविणाऱ्यांविरुध्द ठोस कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

इस्लामपूर येथील  व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांना ४० हजाराच्या खंडणीसाठी गावगुंडांकडून धमकावण्याचा  प्रकार मंगळवारी घडला. यावेळी शिराळा  नाका येथे चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात परदेशी यांनी प्रतिहल्ला  केला होता. पोलिसांनी संशयिताविरुध्द खंडणी मागितल्याप्रकरणी आणि खुनी हल्लाप्रकरणी तक्रार  दाखल करून सोन्या शिंदे, नितीन पालकर, मुज्जमिल शेख आणि जयेश माने या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिराळा नाका परिसरात ही घटना घडली होती. शहरात सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य लोकांना नाहक  त्रास देण्याचे प्रकार  वारंवार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

यामुळे अटक करण्यात आलेल्या चौघा गावगुंडांची  शुक्रवारी  सायंकाळी इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड  काढण्यात आली. शहरातील  गांधी चौक, लाल चौक, शिराळा नाका, बसस्थानक परिसर, सावरकर कॉलनी, संभाजी चौक अशी शहरभर धिंड काढली. ज्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली त्या शिराळा नाका येथील घटनास्थळी संशयितांना नेऊन पंचनामा केला. धिंड पाहण्यासाठी नागरिक, तरुणांनी मोठी गर्दी केली होती.  या कारवाईमुळे पेठ सांगली  मार्गावर वाहतुकीची कोंडीही झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या.