धुळ्यातील जमावाला चिथावणी देण्यासाठी कारणीभूत ठरणारा व्हिडिओ सीरियातील असल्याचे समोर आले आहे. हिंदी भाषेतील या व्हिडिओत मुलांचे मृतदेह दाखवण्यात आले होते. मुले पळवण्याऱ्या टोळीने या निष्पाप मुलांची हत्या केली, असा दावाही व्हिडिओत करण्यात आला होता. मात्र, हा व्हिडिओ सीरियातील असल्याचे तपासात समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी सीरियात एका हल्ल्यात या मुलांचा मृत्यू झाला होता.

धुळे, नंदुरबार आणि लगतच्या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती. व्हॉट्स अॅपवर यासंदर्भातील मेसेजेही फिरत होते. या मेसेजसोबत एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. हिंदी भाषेतील या व्हिडिओत लहान मुलांचे मृतदेह दाखवण्यात आले होते. या निष्पाप मुलांची टोळीने हत्या केली, असे या व्हिडिओत म्हटले होते. मात्र, हा व्हिडिओ भारतातील नसून सीरियातील आहे. २०१३ मध्ये सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाला होता. यात अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. समाजकंटकांनी याच घटनेतील छायाचित्रांचा वापर करत मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवली. या व्हिडिओसह पाकिस्तानमधील अपहरणाच्या एका घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील भारतातील असल्याची चुकीची पसरवली जात आहे. तर मालेगावमधील घटनेसाठी कारणीभूत ठरणारा व्हिडिओ हा मराठीतून होता. मात्र, या अफवा आणि व्हिडिओ कोण पसरवत आहे, हे पोलिसांना अजूनही समजू शकलेले नाही.