भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील सैन्य माघारीबाबत चर्चेच्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून यापुढेही संवादाची प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी सांगितले.

विजयवाडा येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की आतापर्यंत चर्चेतून कुठलाही दृश्य परिणाम झालेला दिसून आला नाही. सैन्य माघारीबाबतची ही चर्चा सुरूच आहे. हा मोठा जटिल प्रश्न असून त्याचा संबंध सैन्याशी असल्याने भौगोलिक ज्ञान गरजेचे आहे. सैन्य नेमके कुठल्या भागात आहे व कुठल्या परिस्थितीत काय करायचे याचा निर्णय कमांडर्सना  घ्यावा लागतो. दोन्ही देशांत मंत्रिपातळीवर चर्चा होणार आहे काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांत चर्चेच्या नऊ फेऱ्या लष्करी कमांडर पातळीवर झाल्या आहेत. त्यात बरीच प्रगती झाली असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात स्थिती तशी नाही. त्या चर्चेचे दृश्यफलित अद्याप बघायला मिळालेले नाही. जयशंकर यांनी म्हटले आहे की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या चीनमधील समपदस्थांशी चर्चा केली आहे.