कराड : सध्या काँग्रेसचा कठीण काळ सुरू आहे. नेते पक्ष सोडून जात आहेत. मात्र तरीही काँग्रेसचा शाश्वत विचार देशाला टिकवून ठेवणारा असल्याने हा पक्ष कधीही संपणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या मतदान केंद्र प्रतिनिधींच्या संवाद मेळाव्यात रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे ते बोलत होते. थोरात म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण विरोधकांची भारी बांधण्यातही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात खूप मोठी कामे केली. पण त्याचा कधीही गवगवा केला नाही. बोलणे कमी आणि काम जादा अशा नेतृत्वाच्या पाठीशी कराड दक्षिणमधील जनता ठाम राहील, असा आपणाला विश्वास असून, पृथ्वीराजांचा विजय राज्यात नव्हेतर देशात दिमाखदार व्हायला हवा. त्यांना विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणेत गुंतवून न ठेवता राज्यभर प्रचारासाठी पाठवा, त्यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही सर्वानी घ्या, निवडणुकीत शुद्ध अंत:करणाने काम करा असे आवाहन थोरात यांनी केले.

विदर्भ, मराठवाडय़ात वातावरण बदलायला लागलेय, पश्चिम महाराष्ट्रातही वातावरण बदलायला वेळ लागणार नाही. समविचारी पक्षांची बोलणी सुरू आहेत. लवकरच आमची मजबूत व बळकट आघाडी होईल. काँग्रेसच्या सध्याच्या कठीण काळात आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत. सन १९८० मध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्या वेळी काँग्रेसची वाताहत झाली होती. पण सामान्यांच्या अंत:करणात काँग्रेस असल्यामुळे इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या. तरी, पक्ष सोडून जाणाऱ्यांना जाऊ  द्या. काँग्रेस वाढवत राहा. नव्या रक्ताची काँग्रेस तयार करा, देशाला काँग्रेस हाच रास्त पर्याय असल्याची मतदारांना पुन्हा साद घाला, असे आवाहन थोरात यांनी कार्यकर्त्यांना केले.

डाव्या विचारांनी महाराष्ट्र बदलाचे फार मोठे काम केले. समाजजीवनात आमूलाग्र बदलाच्या मोठय़ा क्रांतीत डावा विचार महत्त्वाचा होता. त्यात मोलाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते भारतीयांचे कार्ल मार्क्‍स ठरले. त्यांचा डावा विचार व समाजवाद आपणाला विद्यार्थिदशेपासूनच भावला असल्याचे गौरवोद्गार थोरात यांनी काढले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की यशवंतराव मोहिते यांचा विचार कदापि संपू देणार नाही. येथून पुढे विचारांची लढाई होणार आहे. विचारांच्या लढाईत काँग्रेस आणि यशवंतराव मोहिते यांच्या विचारांची जोपासना करा. काँग्रेसचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिद्दीने कामाला लागा.

भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, येथून पुढे प्रत्येक बूथनुसार थेट संवाद होणार आहे. या विभागातील कोणीही पळून न जाता टाचा रोवून चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी राहणार आहे. आमदार संग्राम थोपटे, जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पहिलवान नानासाहेब पाटील, कराड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे आदींची मेळाव्याला उपस्थिती होती.

बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू

अमरावती : विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांमध्ये आघाडी संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी बैठक आहे. धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याने बहुजन वंचित आघाडीशीही चर्चा केली जात आहे. मात्र, सोबत यायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे सांगितले.

महापर्दाफाश सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगितले. थोरात म्हणाले की, महापुराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. ज्या दिवशी सांगली पाण्यात बुडत होती, ब्रम्हनाळला होडी बुडाली, त्या दिवशी सरकार मजेत होते. भाजप सरकारकडे अपयशी सरकार म्हणून बघितले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याला फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार आहेत. भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णत: खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ येईल, असे ते म्हणाले.