पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेऊन सोलापुरात प्रथमच आलो आहे म्हणून सोलापूरकरांनी केलेल्या स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. परंतु आपणास स्वागतासाठी हार-तुरे, फेटे आणि फटाक्यांची आतषबाजी कधीही आवडत नाही. यापुढे मला भेटायला येताना अशा गोष्टी मुळीच आणू नका. मी कधीही फेटा बांधून घेत नाही. हार-तुरे व फेटय़ाच्या बदल्यात पैसे घेतो. या पैशांची लगेचच पोच पावतीही देतो. ही मिळणारी रक्कम आपण शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांसाठी खर्च करतो, अशी माहिती सोलापूरचे नवे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली, तेव्हा सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सारे जण भारावून गेले.

शनिवारी सायंकाळी शिवछत्रपती रंगभवनात सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचा मेळावा वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी बोलताना त्यांनी हार-तुरे व फेटय़ांऐवजी पक्ष कार्यकर्त्यांना चक्क पैसे मागितले. पैसे घेण्याचे कारण समोर आले तेव्हा सारे भारावले. हार-तुरे व फेटे न स्वीकारता त्या मोबदल्यात घेतलेले पैसे आपण शासकीय रुग्णालयातील सामान्य गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी वापरतो. वर्षांकाठी आठ ते दहा लाख रुपये मिळतात. ही रक्कम स्वत:च्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात खर्च करतो, असे त्यांनी सांगितले.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीने शिवसेना व काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी प्रमुख पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढवितानाच राज्याचा सर्वागीण विकासही साधायचा आहे. त्याशिवाय शिवसेना आणि काँग्रेसलाही बरोबर घेऊन आपल्याला जायचे आहे, अशी भूमिका विशद करीत वळसे-पाटील यांनी, सोलापूरच्या विकास प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शरद पवार यांच्या सूचनेनुसार आपल्यावर पालकमंत्री म्हणून सोलापूरची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले.

यापुढे आपण प्रत्येकवेळी सोलापूरला दोन दिवसांसाठी येईन आणि त्यात अर्धा वेळ पक्षसंघटनेसाठी आणि अर्धा वेळ प्रशासनासाठी राहणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करायचे आहे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यात माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, पंढरपूरचे आमदार भारत भालके, मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह माजी आमदार युन्नूस शेख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आदींची उपस्थिती होती.