सोलापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप व पुरस्कृत महाआघाडीने चालविलेल्या हालचाली निष्फळ ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व शेकापच्या साह्य़ाने सत्ता कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाल्याने भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या सत्ता स्थापनेच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होण्यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेश पातळीवरच शिक्कामोर्तब झाले असून जिल्हा स्तरावरही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी तशी औपचारिक घोषणा केली आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव माने सहकारी बँकेत झाली. ६८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला २५ तर भाजपला १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे ७ व शेकापचे ३ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना-५, आघाडी-९ व अपक्ष-२ असे संख्याबळ आहेत. दोन अपक्षांपैकी एक राष्ट्रवादीप्रणीत तर दुसरा भाजपप्रणीत आहे. शिवसेनेच्या पाचपैकी चार सदस्य करमाळ्यातील सेना आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत.

या चारही सदस्यांनी आमदार नारायण पाटील यांच्यासमवेत अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन गरज पडल्यास राष्ट्रवादीला समर्थन देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु तूर्त काँग्रेस व शेकापची मदत घेण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. जिल्हा परिषदेत कांग्रेसला उपाध्यक्षपद सोडण्याचे संकेत मिळाले आहेत. शेकापलाही एखादे सभापतिपद मिळू शकते.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वत:च्या माळशिरस तालुक्यातून आठ सदस्य निवडून आणले असून शिवाय करमाळ्यातील शिवसेनेचे चारही सदस्य मोहिते-पाटील यांचाच शब्द प्रमाण मानणारे आहेत.  त्यामुळे साहजिकच मोहिते-पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा खुले असल्याने तेवढय़ाच प्रमाणात चुरस निर्माण होणे अपेक्षित आहे. या दृष्टीने संभाव्य घडामोडीत मोहिते-पाटील हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत महाआघाडीची सत्ता स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या ‘बाहेर’ असलेले माढय़ाचे संजय शिंदे, पंढरपूरचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक तसेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रयत्न चालविले होते.

अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचीही मदत घेण्याचा डाव आखला गेला होता. तसेच राष्ट्रवादीअंतर्गत मोहिते-पाटील विरोधकांशीही पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादीला अखेर आघाडीसाठी यशस्वी पुढाकार घेणे भाग पडले.