मंत्र्यांच्या बंगल्यांच्या थकीत वीज देयकांचे प्रकरण पुढे आल्याने मंत्री व राज्य शासनाची नाहक बदनामी होत आहे. याप्रकरणी बेस्ट वीज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधीत अधिका-यांची चौकशी होऊन, त्यांच्याकडून थकीत कालावधीतील रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी आपण करणार आहोत, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केली. तसेच, व्याजाची रक्कम त्यांनी जमा न केल्यास आपण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

करोनामुक्त झाल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरली जातात. मुंबईमध्ये “बेस्ट” या कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो, मात्र थकीत कालावधीतील देयके बेस्ट कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली नसल्याचे समजते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन देयके जमा करणे अपेक्षित होते. याबाबत माझे इतर मंत्र्यांशी बोलणे झाले नाही. अशा विषयांवरून सरकारची बदनामी होता कामा नये असे काम अधिकाऱ्यांनी करावे, असेही ते म्हणाले.

करोनातून बरे होऊन आलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये सोमवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. त १८ सप्टेंबर रोजी मुश्रीफ यांना करोनाची लागण झाली होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.