रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी उद्धट वर्तन केल्याचा आरोप करीत शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर डॉक्टरांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
गुरुगोिवदसिंग रुग्णालयात वॉर्ड १२मध्ये हृदयविकाराच्या आजाराने अब्दुल सलीम अ. खादर (वय ४५) यांना दाखल केले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी साहेदाबेगम व अन्य नातेवाईक अब्दुल वाजीद असे दोघे होते. अब्दुल सलीम यांना सलाईन लावण्यात आल्याने त्यांच्या हातावर सूज आली होती. ही बाब नातेवाइकांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, पण तेथील डॉ. सचिन भाटकर यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाशी उद्धट वर्तन केले. तसेच अब्दुल सलीम यांच्या मुलीला ढकलून दिल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. या प्रकारानंतर रुग्णांचे अन्य नातेवाईक तेथे जमले. त्यांनी डय़ुटीवर असलेल्या डॉ. भाटकर, कर्मचारी सुहासिनी िवगेट, रवी शिसोदे, सुप्रिया रंगारी, आकाश पाईकराव यांना मारहाण मारुन गोंधळ घातला. डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
या प्रकाराची चर्चा रुग्णालयात पसरली. मारहाणीच्या निषेधार्थ सर्व निवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आरोपींना अटक होऊन कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर वजिराबादचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावले. त्यांनी डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग न झाल्याने या सर्व डॉक्टरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.