सैन्याच्या त्यागाचा गैरफायदा घेऊ नका अशी माझी भाजपा नेतृत्वाला विनंती आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा वायद्याचं काय झालं अशी विचारणाही यावेळी शरद पवार यांनी केली.

राफेल विमानं खरेदी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्स प्रकरणात भाजपाने चौकशी करण्याची मागणी केली होती. तेव्हा संसदीय कमिटी नेमून चौकशी करण्यात आली. राफेलबाबत वेगवेगळी माहिती दिली जात असून प्रती विमान 350 कोटी किंमत होती, पर्रिकरांनी 750 कोटी किंमत सांगितली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर विरोधीपक्षांची बैठक झाली तरी पंतप्रधान आपले कार्यक्रम सभांमधून विरोधकांवर हल्ला करत होते, मतं मागत होते अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

भाजपा सरकार राज्यात आल्यानंतर 2015 ते 6 मार्च 2018 या अडीच वर्षांच्या काळात 11 हजार 998 शेतकरी आत्महत्या केल्याचं सांगताना शेतकऱ्यांच्या शेताला हमीभाव मिळत नसल्याची खंत शरद पवार यांनी दिली आहे. कर्जमाफीचे नियम क्लिष्ट करण्यात आले असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. नोटाबंदीनंतर 15 लाख लोक बेरोजगार झाले. तसंच 2 कोटी जणांना रोजगार मिळणार होते त्याचं काय झालं असा प्रश्नही शरद पवार यांनी विचारला.