आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. हैदराबादहून इंदोरला निघालेल्या या मोटारीतून साडेसोळा लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला. मात्र, इतका दूरचा प्रवास करणाऱ्यांसोबत असलेले पसे नेमके कुठे गेले? यावर मात्र उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळेच पोलिसांच्या तपासावर संशयाची सुई फिरत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हैदराबाद येथून इंदोरकडे मोठय़ा प्रमाणात गांजाची तस्करी होते. कालच्या अपघातामुळे त्यास पुष्टीच मिळाली. अनेकदा या प्रकरणात ठिकठिकाणी आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. साहजिकच गांजा तस्करीची माहिती पोलिसांनाही आहे. मात्र, तरीही पोलीस यंत्रणा या बाबत डोळेझाक करीत आहे काय, असा संशय बुधवारी सकाळी आला. डोंगरगाव पुलाजवळ झाडावर मोटार (एमपी ९ सीपी ३५५९) आदळून दोघांचा मृत्यू झाला. या वेळी मोटारीत साडेसोळा लाखांचा गांजा पोलिसांनी मोजला. आरोपीविरुद्ध बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे हैदराबाद ते इंदोरकडे जाणारे हे वाहन वाटेत ठिकठिकाणी चौक्यांवर पोलिसांचा कडक पहारा असताना पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धुळ फेकत डोंगरगाव पुलापर्यंत कसे आले? यावरून पोलीस यंत्रणेचे काम संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गांजाशिवाय घटनास्थळी बॅगही सापडली होती. परंतु ही बॅग अचानक पोलीस ठाण्यात आली. तपासणी दरम्यान पोलिसांनी सर्वाना बाहेर काढले व काही वेळानंतर हळूच मोजक्या पत्रकारांना बोलावून बॅगेची तपासणी झाल्याचे दाखविण्यात आले. यात कपडे व साहित्य असल्याचेही दाखविले गेले. हैदराबाद ते इंदोर असा प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींकडे एक रुपयाही कसा नव्हता? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.