भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२३व्या जयंती उत्सवाची सांगता सोलापुरात उद्या रविवारी भव्य मिरवणुकीने होणार आहे. यात शेकडो सार्वजनिक मंडळांसह लाखो आंबेडकरी जनतेचा सहभाग राहणार आहे.
सार्वजनिक उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा डॉ. आंबेडकर हे हयात असतानापासूनच चालत आली आहे. १९५५ साली बुधवार पेठेतील ‘थोरल्या राजवाडय़ा’तील डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी सार्वजनिक मंडळाची स्थापना करून महामानवाचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी दिवंगत ज्येष्ठ चित्रकार उमेश्वर पोरे यांनी तैलरंगात रेखाटलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या सुरेख प्रतिमा आजही पाहावयास मिळतात.