दादासाहेब बिडकर पुरस्कार सोहळ्यात डॉ. विजया वाड यांचे मत

मातृभाषेतून देण्यात येणारे शिक्षण म्हणजे उत्तम शिक्षण होय, असे मांडतांनाच कार्य आणि कर्तृत्व सिद्ध करताना होणारी प्रशंसा आणि टीका यांच्याकडे सकारात्मक दृष्टींने पाहण्याचा सल्ला शिक्षण तज्ज्ञ आणि लेखिका डॉ. विजया वाड यांनी दिला.

पंचवटीतील म्हसरूळ येथे डांग सेवा मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या स्मृतीनिमित्त अभिवादन आणि आदर्श सेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. वाड यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. दादांनी केलेले कार्य आणि कर्तृत्वाबरोबरच देशप्रेम तथा राष्ट्रप्रेम हे प्रखरतेने जाणवले. त्यांनी आदिवासी, मागासवर्गीय, दलित समाजाकरिता त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीत जे कार्य केले ते निश्चितच भूषणावह आणि इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी वंचित अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणले, असे डॉ. वाड यांनी नमूद केले. या वर्षीचा विशेष कार्यकर्ता पुरस्कार महापौर रंजना भानसी यांना डॉ. वाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रुपये ११ हजार रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मानपत्राचे वाचन संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी केले. पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना भानसी यांनी दादासाहेब बिडकर यांनी आदिवासी भागात शिक्षणाविषयी जागर केल्यामुळेच आपल्यासारखी स्त्री आज सामान्य कार्यकर्तीपासून महापौरपदापयंत पोहोचू शकल्याचे नमूद केले. आपणास पिता आणि माजी खासदार कचरूभाऊ  राऊत यांचा राजकीय वारसा लाभला. वडिलांच्या राजकीय जडणघडणीत दादासाहेबांचे तसेच कुटुंबासह समाजाच्या उन्नतीत डांग सेवा मंडळाचे मोठे योगदान राहिल्याचे त्यांनी सांगितले.

काम्प्रिहंस इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ सामान्य व्यवस्थापक एम. डी. देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर याशिवाय हेमंत पद्मनाभन, संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे, सचिव मृणाल जोशी, आबासाहेब म्हसदे, प्रभाकर पवार, प्रतापदादा सोनवणे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते आदर्श सेवक पुरस्काराने आंबेगण आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अर्जुन सावंत, बाऱ्हे विद्यालयाचे उपशिक्षक प्रभाकर अहिरे, अभोणा विद्यालयाचे उपशिक्षक वसंत अहिरे, पेठ विद्यालयातील कलाशिक्षक धनंजय सोनावणे, सुळे आश्रमशाळेच्या स्वयंपाकी अनुसयाबाई भोये, वारे आश्रमशाळेतील कामाठी रवींद्र जाधव यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय १३ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. डांग सेवा मंडळाच्या कार्याला विविध स्वरूपांतून बळ देणारे एम. डी. देशमुख, राजेंद्र उगले, भालचंद्र बहिरम, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सनसन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक सुनील जाधव, मुंजवाडच्या सरपंच आणि संस्थेच्या शिक्षिका पी. के. जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. किरण सूर्यवंशी यांनी केले.