|| नितीन पखाले

नेर तालुक्यातील आजंती गावात जवळपास ४० तरुण विवाहोच्छुक आहेत. त्यातील ३८ तरुणांना मुलींच्या पालकांकडून नकार मिळाला. कारण काय? तर पाणीटंचाई. उर्वरित दोन तरुणांचे विवाह जुळले असले तरी त्यातील एक जण पुण्यात काम करत आहे. दुसऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी संसार थाटण्याचा शब्द वधुपक्षाला दिला आहे. मात्र, दुष्काळझळांनी ३८ तरुणांची विवाहस्वप्ने होरपळून टाकली आहेत.

लग्नानंतर जन्मभर आपल्या मुलीच्या डोईवर पाण्याचा हंडा घेऊन वणवण फिरण्याची वेळ येईल, या भीतीने पालकांनी आपली मुलगी देण्यास गावातील ३८ तरुणांना नकार दिला. ‘लग्न झाल्यापासून डोक्यात पाण्याशिवाय कोणताच विचार आला नाही,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया निर्मला अरसोड या वृद्धेने दिली. आता मुले, सुना, नातवंडांची तरी या समस्येतून सुटका व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईमुळे तरुण शहरात स्थलांतरित होत आहेत. लग्न होत नसल्याने नेर तालुक्यातीलच चिकणी डोमगा गावही भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. जिल्हा परिषदेत गावातीलच सदस्य असूनही तेथील पाणीटंचाई दूर झालेली नाही. जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.

जिल्ह्य़ात सरासरीच्या जवळपास पर्जन्यमानाची नोंद असली तरी पावसाचे पाणी अडविण्यासाठी कुठलीच उपाययोजना नाही. परिणामी पाणी वाहून जाते आणि दर वर्षी पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईमुळे पालकांना मुलींचे विवाह गावाऐवजी शहरात करावे लागतात. शहरात सभागृहापासून पाण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा खर्च होत असल्याने मुलींच्या पालकांचे पाय कर्जात रुततात, ही व्यथा आजंती येथील  एका पालकाने सांगितली.

साठ वर्षे जिल्हा तहानलेला..

खाकीनाथ मनकोजी महाराजांच्या मंदिरामुळे तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या आजंती गावाचा पाणीप्रश्न गेल्या ६० वर्षांपासून कायम आहे.  सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या जिल्ह्य़ातील पहिल्या कामाचे उद्घाटन आजंती गावात झाले. मात्र, ही योजनाही निष्फळ ठरली. गावातील पाणीपुरवठा योजनांवर आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र, तरीही या गावातील पाणीटंचाई दूर झालेली नाही.