मोहन अटाळकर

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्य़ाचे विभाजन करून नवीन अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी आग्रही असताना दुसरीकडे, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने हा विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी हा विषय आता प्रतिष्ठेचा बनला आहे.

राज्यात नवे जिल्हे आणि तालुके निर्मितीचा प्रस्ताव अनेक वर्षे आहे. यात मोठय़ा जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करून नवीन जिल्हे निर्मित करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नव्या जिल्ह्यांच्या मागण्यांचा अभ्यास केला. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची शिफारस केल्याचे सांगण्यात आले, पण या संदर्भातील प्रस्ताव अजून सरकारसमोर आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अचलपूर जिल्हा व्हावा ही मागणी बरीच जुनी आहे. अचलपूर, चांदूर बाजार, धारणी, चिखलदरा आणि अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांना अमरावती जिल्ह्यातून वगळून तसेच मेळघाटमध्ये चुर्णी हा नवीन तालुका तयार करून अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी विभागीय आयुक्तालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर सरकारने तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमंतकुमार पवार यांच्या अध्यक्षतेत चार शासकीय सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण, सदस्य संख्या, सरकारी कार्यालयांची गरज, जिल्हा पातळीवर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता, नव्या जिल्ह्यांची लोकसंख्या तपासून तलाठी सांजेनिर्मिती, जिल्ह्याचे विधानसभा क्षेत्र ठरवले होते. नव्या रचनेत आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह सुमारे ४० अधिकारी नवीन जिल्ह्यासाठी लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

खरे तर अचलपूर जिल्हा व्हावा, ही मागणी १९८० ची आहे. माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, हरिशंकर अग्रवाल आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी त्यावेळी या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदने सादर केली होती. यासाठी सर्वपक्षीय नागरिक कृती समितीही गठित करण्यात आली होती. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना वसुधा देशमुख यांनी सभागृहातच उपोषण सुरू केले होते. १९९८ मध्ये तत्कालीन विधान परिषद सदस्य बी.टी. देशमुख यांनीही या प्रस्तावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.

‘मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष’

अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार युवाशक्तीने ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ ला अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यानंतर ८ नोव्हेंबरपासून तब्बल ४२ दिवस साखळी उपोषण केले. १५५ गावातील युवकांनी यात सहभाग दिला. पुढे बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्ह्यासह १९ मागण्यांकरिता २२ सप्टेंबर २००८ रोजी नागरवाडीत अन्नत्याग आंदोलन केले होते. पण, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच होत असल्याचे अचलपूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक स्थितीचे कारण दर्शवून नवीन जिल्हे निर्मितीचा प्रस्तावच नसल्याचे स्पष्टीकरण दिले असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासमोर नवीन सरकारमध्ये अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आव्हान आहे.

अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव १५ वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. जिल्हा निर्मितीचे निकष आता वेगळे झाले आहेत. अमरावती जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती होऊ शकते. धारणी ते अमरावती हे अंतर तब्बल दीडशे किलोमीटर आहे. लोकांना जिल्ह्याच्या मुख्यालयी पोहचणे गैरसोयीचे आहे. जिल्हा निर्मितीचा विषय जेव्हा समोर येईल, तेव्हा निश्चितच पाठपुरावा करणार आहोत.

-बच्चू कडू, शिक्षण राज्यमंत्री