विरार पूर्वेकडील शिरसाड अंबाडी रोडवर डंपर आणि खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात खासगी बसमधील १५ प्रवाशी जखमी झाले असून दोन महिला गंभीर आहेत. आज (बुधवार) सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास एक डंपर अंबाडीच्या दिशेने भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत जात होता. त्याचवेळी वसईच्या वालीव येथील कामगारांना घेवून गणेशपुरीकडून बस निघाली होती. इतक्यात चांदीप-पारोळ दरम्यान डंपरने या बसला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ मार लागला असून सर्व प्रवाशांना हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे अनेक रुग्णवाहिकांना फोन करून सुद्धा एकही रुग्णवाहिका घटनास्थळी आली नाही. स्थानिक रिक्षा व खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर, विरार पोलिसांनी क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली.