संगमनेर येथील साखर कारखान्यातून साखरेची पोती भरुन आणलेल्या ट्रकची परस्पर विल्हेवाट लावून व्यापार्‍यास तब्बल २३ लाखाचा गंडा घातल्याची घटना धुळे येथे घडली आहे. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात राहणा-या दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर येथील भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्यातून ज्ञानेश्‍वर युवराज नगराळे व सोनु खंडू नगराळे हे दोघे ट्रकमध्ये २१ टन साखरेची सुमारे ४२० पोती भरुन निघाले होते. शिरपूर येथील गोपाल अग्रवाल या व्यापार्‍याकडे ते हा ट्रक पोहोचवणार होते. मात्र  शिरपूर येथे ही पोती न आणता त्यांनी ट्रकसह या मालाची परस्पर विल्हेवाट लावली. साखर कारखान्यातून हा माल निघाला मात्र तो संबंधीत व्यापार्‍याकडे पोहोचला नसल्याचे कळताच धुळ्यातील कापड व्यापारी आणि मालेगावचे रहिवासी सुनिल मुकेश कालडा यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरुन १६ लाखाचा ट्रक आणि ७ लाख ८० हजाराची साखर असा एकुण २३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सत्रे वेगाने फिरवत सोनु खंडू नगराळेला रात्री उशीरा अटक करण्यात आली.