पालघरमध्ये भाजी मंडईतील साईबाबा मंदिर येथे बनावट नोटा वटवून भाजी खरेदी करणाऱ्या एकाला पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांनी आणखीन एकाला अटक केली.

या दोघांनी मिळून हे कृत्य केले होते. बोईसर-सालवड शिवाजी नगर परिसरात त्यांनी प्रिंटरच्या साहाय्याने नोटा छापण्याचा प्रकार सुरू होता. बनावट नोटा बनविण्याचे सामान आणि २००, ५०० आणि १०० रुपयांच्या काही बनावट नोटाही पोलिसानी जप्त केल्या आहेत.

यातील एक जण काही दिवसांपासून भाजी मार्केट परिसरात फिरत असून अनेक वेळा त्याने या खोटय़ा नोटा देऊन भाजी विक्रेत्यांना गंडा घातला होतो, असे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. लक्ष्मीबाई शिरसाठ या भाजीविक्रेत्या महिलेला शंभर रुपयाची बनावट नोट देताना तिला संशय आला. तिने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांच्या कानावर घातली. त्यांनी शंभर रुपयांची नोट तपासायला दिली.

तपासाअंती ती नोट बनावट असल्याचे कळाल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. काही दिवसांपूर्वी बनावट नोटा बदली करणाऱ्या व्यक्तीने याच ठिकाणी अशा शंभर रुपयांच्या नोटा बदलल्या आहेत. यात टोळी असल्याचा संशय पालघर पोलिसांनी व्यक्त केला आहे.