आर्मी एव्हीएशनच्या ताफ्यात लवकरच ध्रुवची नवीन आवृत्ती तसेच ‘अपाची ६४ इ’ ही अत्याधुनिक नवीन हेलिकॉप्टर्स दाखल होणार असुन या माध्यमातुन दलाची क्षमता वृध्दिंगत होणार आहे. भविष्यात लष्कराच्या प्रत्येक कोअरमध्ये हवाई दलाचे युनिट कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती मिलीटरी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार यांनी दिली. येथील आर्मी एव्हिएशनच्या स्कुलतर्फे शनिवारी आयोजित २३ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.
या निमित्ताने लष्कराच्या हवाई दलात ४३ वैमानिकांची तुकडी नव्याने समाविष्ट झाली. यावेळी लेफ्टनंट जनरल ए. के. मिश्रा, ब्रिगेडीअर अजयकुमार सुरी, ब्रिगेडीअर पी. आर. मुराली आदी उपस्थित होते. स्कुलच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात प्रत्यक्ष युद्धात या दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक, लान्सर व ध्रुव हेलिकॉप्टर्सने सहभाग नोंदविला. सुमारे अर्धा तास चाललेल्या प्रात्यक्षिकांनी मैदानास जणू रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. वैमानिकांची कमतरता भरून काढण्यासाठी या स्कुलची स्थापना करण्यात आली आहे. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना येथे सुरूवातीला ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हीएटर्स’ हे कोर्स करावे लागतात. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव प्रशिक्षणार्थीना दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची तुकडी या माध्यमातून लष्कराच्या हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाली. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन करतानाच कुमार यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
भारत हा असा देश आहे की, तो कायम युध्दस्थितीत असतो. सिमारेषांच्या सुरक्षिततेसोबत दहशतवादी कारवायांविरोधात लढाईसाठी सज्ज रहावे लागते. लष्कराच्या सर्व मोहिमांमध्ये आर्मी एव्हीएशनची अतिशय महत्वपूर्ण भूमिका आहे. या पाश्र्वभूमीवर, वैमानिकांनी नवे तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करत या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले. सुरक्षित उड्डाण हा महत्वाचा घटक आहे. सीमावर्ती भागात अतिशय वेगवेगळी भौगोलिक स्थिती आहे. खराब हवामानात पायदळाच्या पुरवठा व्यवस्थेची जबाबदारी हवाई दलास सांभाळावी लागते. या अवघड परिस्थितीत वैमानिक उत्कृष्ट कार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी प्रशिक्षणात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. त्यात कॅप्टन निखीलेश साहू, कॅप्टन प्रवीण शर्मा, कॅप्टन वरुण पराशर, कॅप्टन प्रखर अरोरा यांचा समावेश आहे.