नैसर्गिक आपत्तीनंतर गाव, शहर व लोकांना उभे करण्यासाठी शिवसेना आणि सरकार प्रयत्न करेल. अशी ग्वाही शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून कोकणासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे म्हणून मागणी करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आज युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून लोकांना भेटी दिल्या तसेच डोंगर खचलेल्या गावातील लोकांना धीर दिला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, केंद्रीय उद्योगमंत्री अरविंद सावंत,  आमदार वैभव नाईक, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,  जानव्ही सावंत तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी सासोली, मणेरी, झोळंबे, बांदा, असनीये, सरमळे,  शिरशिंगे, आंबोली या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील पुरबाधित व डोंगर खचलेल्या गावांतील लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

आपण या दौऱ्यानंतर आपल्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडून कोकणासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार आहोत, तसेच पुनर्वसन करण्यासाठी देखील खास पॅकेजची मागणी करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व भूस्खलन लक्षात घेता, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची व विशेषत: स्थानिक जाणकारांची मदत घेऊन आगामी काळात योग्य तो प्लान बनविण्यासाठी प्रयत्न करू, जेणे करून कोणाचा जीव जाऊ  नये, असे नियोजन करू, अशी हमी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.

कोकणासह सबंध राज्यात यावर्षी पावसामुळे आपत्ती आली. त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही. यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, काही मदत हवी असल्यास शिवसैनिकांना सांगा ते नक्की तुमच्यासाठी धावत येतील, असा विश्वासही ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.