शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी छळछावणी ठरत आहे. या ठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक असूनही  तातडीच्या वेळी येथील वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात आढळून येत नाहीत, अशा तक्रारी स्थानिकांच्या आहेत. दिवाळीच्या काळात तर या केंद्रात डॉक्टरांअभावी एका परिचारिकेने अस्वच्छ असलेल्या एकाच चादरीवर आठ महिलांची बाळंतणे केल्याचे उघड झाले आहे. रक्ताने माखलेल्या चादरीवर आठ बाळंतपण झाल्याने त्यांच्यासह बाळाला संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  या सर्व बाबींकडे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सांगवी जिल्हा परिषद गटाचे सदस्य योगेश बादल, सरपंच छाया कोकणी यांच्यासह ग्रामस्थांनी लोकसत्ताकडे केली आहे.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सांगवी गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. आदिवासीबहुल भाग असलेल्या या ठिकाणी नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने डॉक्टरांच्या वसाहतीमधील दोन खोल्यांमध्ये सध्या आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. या ठिकाणी नियुक्तीला असलेले डॉक्टर रात्री थांबत नसल्याने अतीतातडीच्या रुग्णांवर उपचारावेळी ग्रामस्थांची तारांबळ उडते.

दिवाळीत तीन दिवस येथील डॉक्टर सुटीवर गेल्याने त्या दिवसात एका परिचारिकेने आठ  बाळंतपणे केली. या ठिकाणी दाखल करण्यासाठी पूर्णपणे जागाच नसल्याने एका बाळंतणीला तर थेट आरोग्य केंद्राच्या अंगणातच उघडय़ावर ठेवण्यात आले होते. उपचारासाठी येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने घरूनच पाणी आणावे लागते. डॉक्टरांसाठीच्या निवास आणि भांडारगृह, स्वच्छतागृहाचे खंडहर झाले आहे. रुग्णालयाचे, निवासस्थानांचे छत कोसळले आहे. परिसरात झाडी, वेली वाढल्याने साप, विंचू यांचा रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना धोका वाढला आहे.

आरोग्य केंद्रात डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होतात. रात्रीच्या वेळी कोणाला अतिताडीची वैद्यकीय सेवा हवी असल्यास डॉक्टरांअभावी त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाहीत. महिलांना बाळंतपणावेळी प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते. गैरहजर डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी.

-छाया कोकणी (सरपंच, सांगवी, ता.शिरपूर)

सांगवी गावात मोठय़ा प्रमाणात आदिवासींचे वास्तव्य आहे. हा संपूर्ण परिसर आदिवासीबहुल आहे. यामुळे या आदिवासींना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे. आदिवासीसंह ग्रामस्थांना तातडीने पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात.

-योगेश बादल (जिल्हा परिषद सदस्य, सांगवी गट)

दिवाळीत आईची प्रकृति बरी नसल्याने सुटी घेऊन घरी गेलो होतो. परंतु, यावेळी पर्यायी व्यवस्था केलेली होती. आम्ही नेहमीच आरोग्य केंद्रावर उपस्थित असतो. रात्रीही येथेच मुक्कामी असतो. गावातील महिलांसह प्रत्येक रुग्णाला वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो.

—डॉ. मंगेश निकम (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवी)