जळगाव : दोन महिन्यांसाठी मंत्रिमंडळात जाण्यासाठी स्वत: उत्सुक नव्हतो. पुढील काळात राज्यात भाजपची सत्ता आल्यास पाच वर्षांसाठी मंत्रिमंडळात समावेश होण्याची आशा आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले. जिल्ह्यातील बोदवड नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर खडसेंनी मन मोकळे केले.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून एकनाथ खडसेंना सन्मानाने स्थान देण्यात येईल, असे समर्थकांना वाटले होते. प्रत्यक्षात मागच्या दाराने पक्षात आलेल्यांना भाजपकडून थेट मंत्रिपदे बहाल करण्यात आली. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये नाराजी आहे. याविषयी खडसे यांनी मत मांडले. मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदे ही फक्त चार महिन्यासाठी आहेत. त्यातील दीड महिना हा निवडणुकीच्या आचारसंहितेत जाणार आहे. कमी कालावधीसाठी आपण मंत्री होण्यास इच्छुक नव्हतो. पुढील काळात राज्यात पुन्हा भाजप सरकार यावे, यासाठी आपला प्रयत्न राहील. कारण भाजपचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत आपला विचार निश्चित होईल. मंत्रिमंडळात समावेश नाही झाला तरी पक्ष विस्ताराचे कार्य सुरूच ठेवणार असल्याचेही खडसेंनी नमूद केले.

* पक्ष विस्तारासाठी बाहेरची व्यक्ती पक्षात घ्यावीच लागते. परंतु ती व्यक्ती पक्षात घेतांना त्यांचे व्यक्तीमत्व चांगले असावे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसावा. त्यामुळे बाहेरची व्यक्ती पक्षात घेतल्यास ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्या ठिकाणी पक्ष मजबूत होऊ  शकतो. त्याच आधारावर भाजपला आतापर्यंत चांगले यश मिळाले आहे, असेही खडसे यांनी सांगितले.