मतदानापूर्वीच्या अखेरच्या रविवारी निवडणूक प्रचाराला वेग

पालघर : पालघर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदासह २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना एकमेव रविवार प्रचारासाठी मिळाला असल्याने त्याचा पुरेपूर वापर करत मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यास उमेदवारांनी प्राधान्य दिले. दुसरीकडे युतीच्या उमेदवारांचे डिजिटल स्क्रीनद्वारे अद्ययावत प्रचार नाक्यानाक्यावर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील ७ब, ९ब व १२ब या तीन प्रभागांतील निवडणूक अपील केलेल्या उमेदवारांचे अर्ज मान्य केल्यानंतर या तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. या जागांसाठी उमेदवारांचे चिन्हवाटप शनिवारी सायंकाळी उशिराने देण्यात आले. पालघर नगर परिषदेच्या दोन जागांवर बिनविरोध निवड झाली असून उर्वरित २६ जागांवर ८७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे १८, भाजपचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, काँग्रेसचे पाच, बहुजन विकास आघाडीचे पाच तर मनसेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे.

पालघर नगर परिषदेची निवडणूक २४ मार्च रोजी होणार असून प्रचारासाठी मिळालेल्या एकमेव रविवारचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. शनिवारी सायंकाळी व रविवारी संपूर्ण दिवसभरात उमेदवार आपल्या समर्थकांसह आपल्या प्रभागातील मतदारांना घरोघरी

जाऊन भेट देण्याचा सपाटा लावल्याचे दिसून आले. या प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी स्वत:चा परिचय करून देण्यासोबत त्या भागात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच पालघर शहराच्या सर्वागीण विकासासाठी त्यांच्या मनातील संकल्पना

आणि आपल्या पक्षाची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपले मतदारचिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी झेंडे, गमचे, हँडबिल तसेच  फ्लेक्स व बोर्डचा वापर होताना दिसत असून उमेदवारांचा परिचय ध्वनिक्षेपकाद्वारे पोहोचवण्यासाठी रिक्षा व इतरांच्या वाहनाचा वापर सुरू आहे.

मंत्रीही प्रचारात

राज्य सरकारमधील शिवसेना व भाजप पक्षाचे मंत्रीही प्रचार करताना दिसून आले. वेगवेगळ्या प्रभागात जाऊन मंत्र्यांनी स्थानिक समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील विविध भागात असलेल्या समस्यांचा पाढा रहिवाशांनी मंत्रिमहोदयांसमोर वाचला. आगामी काळात समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निरीक्षण पथक अनेक ठिकाणी कार्यरत करण्यात आले आहे. पोलिसांनीही पैशाचे व दारूचे गैरवापर निवडणूक काळात होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली आहे. पालघर शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी होत असून पालघर परिसरात असलेल्या हॉटेल व रिसॉर्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी छापे टाकून तपासणी करत आहेत.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

पालघर शहरातील वातावरण प्रचारामुळे तप्त झाले असून उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याचे प्रकार ठिकठिकाणी सुरू आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असून अशा उमेदवारांकडे प्रचारासाठी मर्यादित निधी व मनुष्यबळ नसल्याने अशी मंडळी घरोघरी प्रचार करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहे.