अनेकदा तक्रारी करुनही कारवाईकडे दुर्लक्ष

पालघर : कासा भागामध्ये असलेल्या काही आदिवासी जमिनींवर शासकीय सेवेत असलेल्या काही मंडळींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.  याप्रकरणी जागामालकाने विविध स्तरांवर तक्रार नोंदविल्यानंतरदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे दिसून आले आहे.

कासा बाजारपेठेत पाटबंधारे विभागाच्या पाटालगत जवळ असलेल्या जागेत मालकी जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही आदिवासी व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर एका शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीने टाळेबंदीचा लाभ उचलत दुकानांचे बांधकाम सुरू केले आहे. याप्रकरणी आदिवासी व्यक्तीने महसूल व्यवस्था तसेच ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यातदेखील तक्रार नोंदविण्यात आली आहे.

याप्रकरणी ग्रामपंचायतीने संबंधित व्यक्तीला नोटीस बजावली असली तरीदेखील आदिवासी जागेत बांधकाम सुरूच ठेवले आहे. याप्रकरणी दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे कासा पोलीस ठाण्याचे  प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कासा परिसरात तसेच राष्ट्रीय महामार्गालगत अनेक आदिवासी जागांवर अतिक्रमण व बांधकाम झाल्याचे दिसून येत असून त्या विरुद्ध कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.