दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबात दोन स्वतंत्र राजकीय मार्ग झाल्यामुळे त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये. ते शक्य नसल्याचे स्पष्टीकरण भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी दिले. ‘माझे बाबा, स्व. गोपीनाथ मुंडे यांचा ‘उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ हा वारसा मी चालवेल. मोडेन पण वाकणार नाही, कोणताही तह, तडजोड आणि कोणापुढेही झुकणार नाही. स्वाभिमानानेच शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल, प्रेम करणाऱ्या जनतेला कधीही अंतर देणार नाही,’ असे सांगत पंकजा पालवे यांनी त्यांची राजकीय दिशा स्पष्ट केली. बोलताना त्यांना अश्रू आवरत नव्हते. त्यामुळे उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.
 परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तेराव्यानिमित्त रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन व गोड जेवण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पहिल्यांदाच आमदार पंकजा पालवे यांनी यावेळी आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या. ध्वनिक्षेपकासमोर उभे राहताच पंकजा यांनी अनावर झालेल्या अश्रूंना आवरत ‘बाबांना हेलिकॉप्टर घेऊन येणार होते, म्हणून त्यांची वाट पाहत होते. त्यांचा नागरी सत्कार करताना व्यासपीठावरून त्यांना मंत्री म्हणून पाहायचे होते. पण आकाश कोसळले, सावली निघून गेली, काय बोलावे हे सुचत नाही. सगळे सोडून देऊन भगवे वस्त्र घालून कोठेतरी निघून जावे, असा विचार मनात येतो. मात्र, मृत्यूपूर्वी दोन दिवसांआधी भगवानगडावरून बाबांनी मला वारस म्हणून जाहीर केले होते. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना पोरकं करू नको, असे सांगितले होते. मला काही पाहिजे नव्हते. बाबांसाठी  राजकारणात आले. राज्यात फिरले, भीती वाटली नाही. मात्र माझ्या फाटक्या झोळीत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना टाकून ते गेले. अनेकजण येऊन सांगतात, ताई, आम्हाला साहेबांनी डॉक्टर केले, इंजिनीअर केले. त्यांनी अनेकांना मोठे केले. पण त्यांची पुण्याई का कमी पडली? देवापेक्षा देवमाणूस मोठा असतो, असेच वाटते. साहेबांनी स्वाभिमान शिकवला, त्यांचाच कणा माझ्यात आहे. मी मोडेन पण वाकणार नाही. साहेब जेव्हा एकटे पडले, तेव्हा त्यांच्या डोळय़ातील भाबडेपणा मी जवळून पाहिला. प्रत्येक जण येऊन त्यांना काही तरी मागत असे, पण त्यांना काय पाहिजे, हे कोणी विचारत नव्हते. त्यांना आईच्या मायेने समजून घेण्याचा प्रयत्न केला.
  परळी परिसरात काही अफवांना ऊत आले आहे. पण साहेब असतानाच कुटुंबात दोन राजकीय मार्ग निर्माण झाल्यामुळे कोणीही त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नये. ते शक्य नसल्याचे स्पष्ट मत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे व्यक्त केले. त्यामुळे मुंडे यांच्यानंतर त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा पालवे पुन्हा एकत्र येण्याच्या चच्रेला पूर्णविराम मिळाला आहे.