नागपुरात एका 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सौरभ नागपुरकर असं या तरुणाचं नाव असून पोलिसांना तो मानसिक तणावात होता अशी माहिती दिली आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यामध्ये आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे.

तरुणाने एक पानाची सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने आपण साक्षीदार असलेल्या एका अपघाताचा उल्लेख केला आहे. ‘दोन महिन्यांपूर्वी आपण एका लहान मुलाचा अपघात होताना पाहिला होता. त्या मुलाचा आत्मा आपल्याला बोलवत असल्याचं त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे’, अशी माहिती पोलीस अधिकारी तुळशीराम यांनी दिली आहे.

‘तरुणाचे दोन छोटे अपघातही झाले होते. सुसाइड नोटनुसार हे अपघात त्या लहान मुलामुळेच झाले होते. तो लहान मुलगा आपल्या रस्त्यात अडथळा आणत होता असं तरुणाने लिहिलं आहे’, अशी माहिती तुळशीराम यांनी दिली आहे.

सौरभ अभ्यासात खूप हुशार होता, मात्र गेल्या एक महिन्यांपासून तो कोणाशीच काहीच बोलत नव्हता असं पोलिसांनी सांगितलं आहे. आपण घाबरलो आहोत असं त्याने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्यामागे वडील आणि मोठी बहिण आहे.