24 November 2017

News Flash

उजनी थेट पाइपलाइन पाणी योजनेत दररोज ७० लाख लिटर पाणी वाया

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण थेट पाइपलाइन योजनेला कोठेही गळती होऊ नये म्हणून

प्रतिनिधी/सोलापूर | Updated: January 9, 2013 5:25 AM

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण थेट पाइपलाइन योजनेला कोठेही गळती होऊ नये म्हणून खासगी पथक तैनात करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या पाणी योजनेतील जलवाहिन्यांतील गळती व पाणीचोरी थांबली नसून उलट त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. या पाणी योजनेत पाणीगळती व चोरीमुळे दररोज तब्बल ७० लाख लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक माहिती पालिका प्रशासनाकडून महापालिका सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
दरम्यान, भीमा-टाकळी पाणी योजनेसाठी उजनी धरणातून सोडलेले साडेचार टीएमसी पाणी उद्या गुरुवापर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचणे अपेक्षित आहे. त्यामुळे शहरावर कोसळलेले जलसंकट दूर होऊन शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे म्हणजे एक दिवसाआड होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेण्यात आले.
उजनी धरण ते सोलापूर थेट पाइपलाइन पाणीयोजना १८ वर्षांपूर्वीची असून या योजनेची दररोज ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात दररोज ७० एमएलडी पाणीपुरवठा होतो. या पाणीयोजनेतील जलवाहिन्यांना होणारी गळती व पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच खासगी तत्त्वावर फिरते पथक नियुक्त केले आहे. परंतु हे फिरते पथक कार्यरत झाल्यानंतर पाणी गळती व पाणी चोरी थांबणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती व चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या दररोज तब्बल ७० लाख लिटर म्हणजे सात एमएलडी पाण्याची गळती किंवा चोरी होते. त्यामुळे प्रत्यक्षात शहराला उजनी थेटपाइपलाइन योजनेद्वारे ५५ एमएलडीपर्यंत पाणी मिळते. उजनी थेट पाइपलाइन योजनेसाठी खासगी पथक तैनात करून देखील मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असेल, तर या पथकाची गरजच काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची बचत महत्वाची असताना त्याबद्दल प्रशासन गाफील असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना १२० एमएलडी पाणी लागते. उजनी धरणातून ५५ टीएमसी तर भीमा-टाकळी योजनेतून ४० एमएलडी तर १० एमएलडी पाणी हिप्परगा तलावातून मिळते. भीमा-टाकळी योजनेतील पाणीसाठा संपल्यामुळे सध्या शहरात जलसंकट निर्माण झाले असून त्यासाठी उजनी धरणातून ठरलेल्या नियोजनानुसार साडेचार टीएमसी पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आले आहे. हे पाणी येत्या एकदोन दिवसात टाकळीत पोहोचणे अपेक्षित आहे.  

First Published on January 9, 2013 5:25 am

Web Title: everyday 70 lac leter water goes waste in ujani water pipeline yojana