केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. त्यामुळे अचानक त्यांनी ही घोषणा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडीओत आपण निवृत्ती घेत असल्याचं कारण स्पष्ट केलं असून याचा कौटुंबिक किंवा इतर गोष्टींशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितलं आहे की, “लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे”. महत्त्वाचं म्हणजे यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपली पत्नी संजना जाधव उत्तराधिकारी असतील अशी घोषणाही केली आहे.

आणखी वाचा- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय निवृत्ती केली जाहीर, राजकीय क्षेत्रात खळबळ

“माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो,” असं आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे.

“प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही,” असा विश्वास हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे. “आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,” असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.