पुढील आठवडय़ापर्यंत इतरत्र मोठय़ा पावसाचा इशारा नाही
पुणे : राज्यात कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात पुढील तीन ते चार दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसांच्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उर्वरित राज्यात मोठा पाऊस होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण विभाग वगळता सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने दडी मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. कुठेही मोठय़ा पावसाची नोंद झाली नाही. दोन ते तीन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणासह उर्वरित राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. धरण क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर पावसाची नोंद झाल्याने पाण्याच्या साठय़ामध्ये काहीशी वाढ झाली आहे.
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये प्रगती केली आहे. मध्य प्रदेशातील मध्यवर्ती भाग आणि दक्षिण उत्तर प्रदेशावर समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. परिणामी पुढील दोन दिवस पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पाऊसभान..
महाराष्ट्राबाबत हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ५ ते ८ जुलै दरम्यान कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मुंबईत अधूनमधून मुसळधार सरींसह थांबून- थांबून पाऊस होईल. पुण्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.